Sunday, November 25, 2018

"मुखवटे: भाग सत्तावीसवा"

"मुखवटे: भाग सत्तावीसवा"

"तिला पाऊस आवडतो
मला पावसात ती..
मला आवडते ती
पण तिला आवडत नाही मी
भोकात गेला पाऊस
आणि भोकात गेली ती"

नेहमी देव-देव करणाऱ्या अनंतने हा पाठवलेला हा मेसेज पाहून मी देखील हसलो.
प्रियाशी ब्रेकअप झाल्यानंतर त्यादिवशी पहिल्यांदा निदान एवढा तरी हसलो असेन.
ऑफिशिअल असं एकमेकांना सांगितलं नव्हतं पण त्या लॉंग डिस्टन्स रेलशनशीप ला आता काही अर्थ राहिला नव्हता.
झालेल्या भांडणाचा तिला राग आला असावा म्हणून मीच पुन्हा भेटून तिचा राग घालवायचा म्हणून गेल्या शनिवारी पुन्हा भेटायचं ठरवलं होतं.
आमची बी. ई. इंडस्ट्रीयल व्हिजिट जाणार होती घाटगे-पाटील मोटर्स ला. तेव्हा बारा वाजेपर्यंत व्हिजिट संपवून 1 वाजता भवानी मंडपात भेटता येईल म्हणून त्याच दिवशी भेटायचं ठरवलं. तीही तयार झाली.
व्हिजिट ला आलो तेव्हा काही लक्षच लागेल. साडे दहा-अकरा वाजताच व्हिजिट निम्यात सोडून सटकलो. ईलाला फक्त जाताना सांगितलं होतं की प्रियाला भेटायला जाणार आहे म्हणून. व्हिजिट साठी सोबत आलेल्या सरांनी 9 वाजता आल्या आल्याचं अटेंडन्स घेतली होती. त्यामुळे बिनदास्त सटकलो.
बाराच्या जवळपास पोहचलो असेन मी मंडपात. प्रिया येण्यासाठी अजून तासभर वेळ होता. भूक लागली होती. नेहमीचा मंडपातल्या राजाभाऊ भेळचे दुकान बंद दिसत होते. बाहेर बोर्ड लावला होता की राजाभाऊ च्या दुकानामुळे PMT स्टँड वर ट्राफिक वाढत आहे त्यामुळे त्यांना शाहू मैदानाजवळ च्या जवळ जागा दिली आहे.

प्रिया आल्यानंतर सोबतच काहीतरी खाऊ असा विचार करून तिथेच बसून राहिलो. दुपारची गर्दी वाढत होती. लहान-सहान खेळण्यांची आणि फुग्यांची रस्त्याच्या बाजूला मांडामांड सुरू होती. जनता बझार च्या बाजूला बसलेल्या भिकाऱ्या वर नजर गेली माझी. आपल्या वाढलेल्या काळ्या पांढऱ्या दाढीमुळे रवींद्रनाथ टागोरांसारखा दिसत होता तो. मी थोडं जवळ जाऊन आपल्या मोबाईल मध्ये त्याचा फोटो काढला आणि पुन्हा प्रियाची वाट पाहत उभा राहिलो.
एक वाजला तरी अजून प्रिया काही आली नव्हती. तिला फोन केला. रिंग झाली पण उचलला नाही तिने कॉल. चार पाच वेळा पुन्हा कॉल केला. अस्वस्थ व्हायला होतं होते. त्यात ढगाळ वातावरण व्हायला लागले. एक दोन ठिबके पडले तसे पुन्हा मी तिला कॉल केला पण तेव्हा तर फोनच स्विच ऑफ येऊ लागला.
आता तर हद्द झाली होती. प्रत्येक दहा पंधरा मिनिटाला कॉल करत करत पाच वाजले तरी मी तसाच उपाशी मंडपात भटकत होतो.
मुसळधार पावसाला सुरवात झाली. मी तसाच रागारागात भिजत शिवाजी चौकात येऊन पोहचलो. त्या दिवशीच्या भांडणानंतर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता जवळपास संपली होती.
तेवढ्यात ईला आणि बाकीची सगळी गँग व्हिजिट संपवून कोल्हापुरात फिरून शिवाजी चौकातच पुन्हा परत जाण्यासाठी आली होती. ईलाने मी पावसात भिजत असल्याचं पाहून विचारलं
"अरे भिजतोयस का? भेटली का प्रिया"
मी काही उत्तर दिलं नाही. मन खाली घालून तसाच भिजत उभा राहिलो.
ईलाला उत्तर समजायचं ते समजलं.
आज पहिल्यांदाच झालं असं नाही. गेल्या चार-पाच भेटींपासून हेच नाटक सुरू होत. तीन-तीन चार-चार तास वाट पहायला लावायची म्हणजे माझ्या सहन शक्ती च्या बाहेर होतं...
त्या दिवशी भांडण व्हायचं कारण देखील हेच. प्रियाचा रिचेकिंग चा फॉर्म भरायची शेवटची तारीख होती. एकच गोल्डन विषय बॅक राहिल्यामुळे तिचे वर्ष वाया जायची भीती वाटत होती म्हणून तिला सकाळी दहा वाजता विद्यापीठात बोलावले होते मी.
पण संध्याकाळी चार वाजले तरी आले नाही. मीही वैतागून घरी निघालो.
बस कोल्हापुरातून बाहेर पडली तेव्हा प्रियाचा फोन आला आता विद्यापीठात आले म्हणून..
सटकली होती.
तरीही फॉर्म भरायचा शेवटचा दिवस असल्यामुळे पुढच्याच स्टॉपवर उतरून पुन्हा विद्यापीठात आली.
सहा वाजायला पंधरा वीस मिनिटे बाकी असतील तेव्हा पोहचलो विद्यापीठात. परीक्षा विभागाजवळ गेलो. पाहतो तर प्रिया आपल्या एका मित्रासोबत हसत खेळत गप्पा मारत बसली होती.
ना अजून तिने फॉर्म घेतला होता ना भरला होता. थोड्या वेळाने येतो असे सांगून तिचा मित्र निघाला. मी फॉर्म घेतला. मीच भरला. आणि निकालाची झेरॉक्स लावून फी भरून जमा देखील केला. तो पर्यंत एक अक्षर देखील तिच्याशी बोललो नाही.
मला राग आला आहे हे तुला समजले होते.
लाडात येऊन काहीतरी बोलून ती राग काढण्याचा प्रयत्न करीत होती.
"आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊया चल" म्हणून माझा हात तिने ओढला..
मी फटकन तिचा हात झटकला. आणि एका हाताने तिचे केस धरून ओढतच ओरडलो.
"तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही.
मी काय आई घालायला बोलावले होते का 10 वाजता....!"
माझा संताप अनावर झाला होतो..
"आनंद.." ती ओरडली
"लोक बघत आहेत, सोड केस, just leave me"
मी केस सोडले. आणि झपाझप चालत विद्यापीठाच्या गेट कडे निघालो.
मी मागे वळून पाहिले नाही आणि तिने आवाज देखील दिला नाही.
हो संताप आला होता मला.. पण भांडण मिटविण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता आता.
पण प्रिया आली नाही.
मी आणि व्हिजिट ला आलेले सगळे मित्र एकत्रच परत गेलो. माझे सांगलीचे प्रोजेक्ट ग्रुप मेम्बर्स रात्री आमच्या रुमवरच थांबणार होते.
संध्याकाळी बसायचा प्लॅन ठरला. मी आधी कधी घेतली नव्हती. त्यामुळे दिप्याने माझ्यासाठी बियर मागवली. त्याच्या कडवट चवीने कसेसेच झाले. पिऊ वाटेना. मी घेत नाहीये हे पाहून एका हातात सिगरेट आणि एका हातात भरलेला ग्लास असलेल्या निकल्या ने आपले लॉजिक सांगायला सुरुवात केली.
"हे बघ आंड्या,
रोज व्यायाम केला, मेडिटेशन केले
मटण खाल्ले नाही, चिकन खाल्ले नाही, xxx मारली नाही, सिगरेट ओढली नाही, दारू पिली नाही की आपले आयुष्य वाढते हे खरे..
पण आयुष्य वाढणार केव्हा..?
आपल्या म्हातारपणी..
आपल्याला तर आता कुठे कोंब फुटायला सुरवात झालीय
त्यामुळं वड तू.."
एका झटक्यात त्याने टॉप टू बॉटम मारून ग्लास संपवला.
".. वड तू
आणि भर तू.."
म्हणत त्याने ग्लास दिप्या समोर ठेवला.
आपली सिगरेट दिप्या ला देत निकल्या म्हणाला
" try कर एकदा भावा.. जन्नत आहे जन्नत.."
निकल्या करामती होता. सिगरेट मधली तंबाखू काढून त्यात गांजा भरायचा आणि तशीच ओढायचा. सगळं समान कुठं मिळायचं त्याला नक्की माहीत होत. पण अभ्यासात पण तेवढंच शार्प देखील होता.
मैफिल जमू लागली..
सिगरेट च्या धुराने आणि बियर ने चढायला लागली मला हळू हळू..
नंतरच कांहीं ज्यास्त आठवत नाही.
दुसऱ्या दिवशी दुपारी एक दोन वाजता उठलो तेव्हा डोकं खूप जड झालं होतं.
क्रमश: