Tuesday, December 4, 2018

गीतांबरी

२२ नोव्हेंबरला "गीतांबरी" चा म्हणजे माझ्या मुलीचा जन्म झाला.

तीचा  गोंडस चेहरा आपल्या आईसारखा आणि माझ्यासारखे म्हणजे आपल्या बाबांसारखे चायनीज डोळे घेऊन आली आहेत असे म्हणतात लोक.. पण स्वतःचं असं जर ती काही सोबत घेऊन आली असेल तर ते आपलं स्वतःच प्रारब्ध एवढंच मी म्हणेन...

मुलगी झाली तर तीच नाव गीतांबरी ठेवावं  असं गेल्या पाच सहा महिन्यांपासूनच मनामध्ये घोळत होतं... कारणही अगदी खास आहे...

गेल्या दीड एक वर्षांपासून मी एका आंदोलनात ओढले गेलो... सर्व काही ठीक सुरु असताना अचानकपणे जीवनाचे सगळे संदर्भ, जगण्याची उद्दिष्टे आणि मूल्येदेखील अगदीच छोटी वाटू लागली. सफेद पोशी म्हणवून घेणाऱ्या काही एक लोकांमुळे हजारो उच्यशिक्षित लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या नाडया आवळल्या गेल्याचे पाहून अंतर्मन अगदी पिळवटून निघालं. कारण त्यापैकीच मी देखील एक होतो..

पैसा आणि सत्येच्या हव्यासापोटी जीवनमूल्यांचा झालेला ऱ्हास आणि त्यातून जन्मलेला एक जीवनसंघर्ष याचे संदर्भ आपल्याला काही नवीन नाहीत. अगदी पुरतं काळापासून रामायण महाभारतापासून आपण ते पाहत आलो आहोत. पण आपल्याही जीवनात कुरुक्षेत्र उभं पाहिलं याची कल्पना मी कधीच केली नव्हती.

त्या आंदोलनाने अक्षरश अंतर्बाह्य सुलाखून होरपळून काढलं. या युद्धातून पळ काढण्याची शेकडो कारणे आणि संधी असताना देखील मी लढत राहण्याचा निर्णय घेतला तो 'गीतांबरी" मुळेच...

सुप्रसिद्ध लेखक कादंबरीकार श्री. भा. द. खेर यांचे सुपुत्र श्री. राजेंद्र खेर यांनी आपल्या वडिलांची गीतेच्या तत्वज्ञानावर कादंबरी लिहिण्याची इच्छापूर्ती केली ती या गीतांबरी नावाच्या कादंबरीने...

ऐन आंदोलनाच्या काळात ही कादंबरी वाचायला मिळाली आणि  कुरुक्षेत्रावर गोंधळलेल्या अर्जुनासारखी माझी जी अवस्था झाली होती त्याला सांभाळून, समजवून या जीवनसंघर्षच्या कुरुक्षेत्रावर एक कर्तव्य म्हणून लढण्याची प्रेरणा मिळाली. यातुन आपल्याला काही मिळणार तर नाहीच उलट हानीच होण्याची श्यक्यता ज्यास्त आहे,  याची कल्पना मला नव्हती असे नाही मात्र निष्काम कर्मयोगाच्या भावनेने समष्टीच्या हितासाठी लढणे आता अनिवार्य आहे याची जाणीव या कादंबरीने मला करून दिले. 

याचा अर्थ असा बिलकुल नाही की मला आता भागवतगीतेचा संपूर्ण सार समजला, सगळे योग्य समजले आणि आत जीवनाकडे अर्थपूर्ण रित्या पाहण्याची दिव्यदृष्टी मिळाली वगैरे पण,
गीतेमधल्या काही एक श्लोकांचा अर्थ जो समजला त्यातून जीवनाकडे एक सकारात्मक संघर्ष म्हणून पाहण्याची व चिरंतर राहील असे कर्तृत्व करून दाखविण्याची दृष्टी मात्र मिळाली.

मला सर्वाधिक भावलेला तो श्लोक.

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैततत्त्वय्युपपद्यते ।

क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ।

म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा ।।

अर्जुनाच्या पराक्रमाला चेतावणारे हे शब्द श्रीकृष्णाचं कितीतरी वेळा मी मनोमनी उच्चारले असतील.

एव्हाना माझ्या सहचरणीने गर्भ धारण केला होता...
रोजच्या आक्रंदक आणि कंटाळवाण्या आंदोलनाच्या संभाषणांनी आम्ही दोघेही वैतागलो होतो, अश्यावेळी आम्हा दोघांमध्ये मग महाभारतातील गोष्टी, गीतेचे श्लोक आणि अर्थ यांच्यावर नकळत चर्चा घडून येत होती. 

अभिमन्यूला ज्या प्रमाणे चक्रव्युव्हाचे ज्ञान गर्भात असतानाच झालेलं होते त्याप्रमाणे आपल्या होणाऱ्या अपत्यावर देखील गीतेचे काही संस्कार नकळत झाले असतील असे वाटत होते. 
होणाऱ्या बाळाचे नाव काय ठेवावे यावर आम्ही कधी विचार करत असू तेव्हा, आता जसे चित्रपटातील अथवा टीव्हीवरील मालिकांच्या पात्रांवरून प्रभावित होऊन आपल्या मुलांची नावे ठेवण्याचा ट्रेंड सोडून, ज्या पुस्तकाने आपण प्रभावित होऊन हा संघर्ष आरंभला आहे त्या पुस्तकाचेच नाव, म्हणजेच "गीतांबरी" ठेवावे हे मी मनात निश्चित केले होते. 

ईश्वरकृपेने मुलगी व्हावी ही माझी इच्छा पूर्ण झाली. 
भगवतगीतेच्या सत्वांची आणि तत्वांची ज्योत माझ्या मुलीच्या "गीतांबरी"च्या हृदयात तेवत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!